माण–खटावच्या शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय; संघर्षामुळे तीन पाणी आवर्तने मंजूर

माण–खटावच्या शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय; संघर्षामुळे तीन पाणी आवर्तने मंजूर – पाण्यावर कुणाची मक्तेदारी नाही.!


म्हसवड | प्रतिनिधी :
माण–खटाव तालुक्यासाठी पाण्याच्या हक्कासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र संघर्षाला अखेर यश आले आहे. जलसिंचन मंडळाने माण–खटाव तालुक्यास तीन पाणी आवर्तने देण्याची अधिकृत व्यवस्था केली असून, त्यानुसार आज पहिल्या आवर्तनाचे पाणी माण तालुक्याच्या पूर्व भागात पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर जांभुळणी गावात शेतकरी व महिलांनी पाण्याचे पूजन करून आनंद साजरा केला.
या वेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले,
“हा कुणा एका नेत्याचा विजय नाही, हा ३० एप्रिल २०२५ रोजी म्हसवडमध्ये अर्धनग्न मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा विजय आहे. त्या संघर्षाची फळे आज पाण्याच्या रूपाने शेतापर्यंत पोहोचली आहेत.”
करचे यांनी सांगितले की, त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार आणि सातारा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांशी झालेल्या प्रत्यक्ष चर्चेनंतर माण–खटाव तालुक्यास जानेवारी, मार्च आणि मे या तीन टप्प्यांत पाणी आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता माण–खटावच्या शेतकऱ्यांना नियोजनबद्ध शेती करणे शक्य होणार आहे.
यावेळी करचे यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवत म्हटले,
“ज्या गावात कमी मते मिळाली तिथे पाणी नाही, ज्या गावात जास्त मते मिळाली तिथे पाणी – ही घाणेरडी राजकीय भूमिका आज मोडीत निघाली आहे. पाणी कुणाच्या मालकीचं नाही. माण–खटावमधील प्रत्येक शेतकऱ्याचा पाण्यावर समान अधिकार आहे आणि तो अधिकार आज प्रत्यक्षात सिद्ध झाला आहे.”
गेल्या वर्षी कागदावर पाणी मंजूर दाखवून प्रत्यक्षात ते दुसरीकडे वळवण्यात आले होते. शेवटच्या टोकावरील गावांवर अन्याय झाला होता आणि आंदोलन करणाऱ्या गावांमध्ये जमावबंदी लावून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान, जानेवारीत पाणी न मिळाल्यास महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या संघर्षामुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागली, असे करचे यांनी ठणकावून सांगितले.


“पाण्यासाठी राजकारण करणाऱ्यांना हा थेट इशारा आहे. शेतकऱ्यांच्या हक्कावर पुन्हा डल्ला मारण्याचा प्रयत्न झाला, तर माण–खटाव शांत बसणार नाही,” असा ठाम इशाराही महेश करचे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *