‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने अवघी म्हसवडनगरी दुमदुमली; गुलाल–खोबर्याची उधळण

म्हसवड : वृत्तसेवा
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा भव्यदिव्य रथोत्सव यंदा नेहमीप्रमाणे अतिशय उत्साहात आणि लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला. ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या गगनभेदी जयघोषात, गुलाल–खोबर्याच्या उधळणीने आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या नादात संपूर्ण शहर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले.
पाच लाख भाविकांची उपस्थिती : उत्सवमूर्तींची भव्य मिरवणूक
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सुमारे पाच लाख भक्तांनी या उत्सवात हजेरी लावली. सालकरी यांच्या घरातून वाजत-गाजत उत्सवमूर्ती रथावर विराजमान करण्यात आल्या. दुपारी 2.45 वाजता मिरवणुकीला शुभारंभ झाला.
रथावर विराजमान होण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून अजितराव, बाळासाहेब, पृथ्वीराज, सयाजीराव, गणपतराव राजेमाने यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रथोत्सवाला प्रारंभ झाला.
सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांच्या मानाच्या सासनकाठ्याही रथाच्या भेटीस मोठ्या उत्साहात दाखल झाल्या.
दिवाळीपासून सुरू झालेला सोहळा — रथोत्सवाने झाला समारोप
श्रींचा पारंपरिक विवाह सोहळा दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना व हळदीपासून सुरू झाला होता. तुळशीविवाह, विवाह सोहळा अशा विविध धार्मिक विधींनंतर हा महिनाभराचा सोहळा शुक्रवारी वरातेसमान रथोत्सवाने संपन्न झाला.
नगरी गुलालाने न्हाऊन निघाली
या वर्षी नदीपात्रात पाणी असल्याने पारंपरिक मार्ग बदलून बायपास मार्गे रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाला.
रथावर गुलाल–खोबर्याची उधळण, निशाणे, पैशांच्या नोटांची तोरणे अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन निघाल्याचे अप्रतिम दृश्य मंत्रमुग्ध करणारे होते.
रथाच्या मार्गावर बहिणीस साडी-चोळीचा मानाचा आहेर देण्यात आला, तर नवस फेडण्यासाठी नवसाची मुले रथावरून खाली टाकण्याची पारंपरिक प्रथा उत्साहात पार पडली.
शिस्तबद्ध व्यवस्था : पोलिस दल, स्वयंसेवकांचा मोठा सहभाग
कराड, वडूज, विटा, अकलूज, सातारा, सोलापूर, पंढरपूर आदी ठिकाणांहून एसटीने जादा बसेस सोडल्या होत्या.
रथोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी 15 पोलिस अधिकारी, 150 कर्मचारी, 35 महिला अधिकारी, 125 होमगार्ड, 250 स्वयंसेवक असा दणदणीत बंदोबस्त तैनात होता.
प्रांताधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार, नगरपालिका अधिकारी अशा सर्व प्रशासकीय यंत्रणेने उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी योगदान दिले.
पहाटेपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा
रथोत्सवामुळे पहाटेपासूनच मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. रिंगावण पेठ मैदानात भरलेल्या यात्रेत दिवसभर खरेदीसाठी गर्दी उसळली होती.
यांत्रिक पाळणे, मौतका कुंवा, नाना-नानी पार्क आदी खेळांच्या साधनांनी बालगोपाळांची मनं जिंकली. मिठाई, खेळणी व इतर वस्तूंच्या दुकानांनाही मोठी गर्दी लाभली.
