स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध; महावितरणकडून 24 तासांची नोटीस,वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा, आंदोलनाचा इशारा
म्हसवड | प्रतिनिधी
आज दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी महावितरण कंपनीच्या म्हसवड येथील सहाय्यक अभियंत्यांनी किशोर भोजलिंग सोनवणे (रा. म्हसवड) यांना स्मार्ट मीटर बसविण्यास सहकार्य न केल्याबाबत 24 तासांची लेखी नोटीस बजावली आहे.
महावितरण कंपनीमार्फत महाराष्ट्र शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र योजना अंतर्गत शहरात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असून, हे काम केंद्र व राज्य शासनाच्या अधिसूचना व नियमावलीनुसार केले जात असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या वीज मीटर नियम 2006 तसेच 2019 व 2022 मधील सुधारणा यानुसार टप्प्याटप्प्याने सर्व पारंपरिक मीटरचे स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणच्या अधिकृत कर्मचाऱ्यांना मीटर बसविण्यास प्रवेश नाकारल्याची नोंद झाल्याने हा प्रकार कायद्याचे उल्लंघन ठरत असल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे. अशा परिस्थितीत 24 तासांची डिजिटल नोटीस देऊन वीजपुरवठा खंडित करण्याचा अधिकार वितरण कंपनीला आहे, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, किशोर सोनवणे यांनी सांगितले की, “स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढते असा गैरसमज पसरवला जात असला तरी गावकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मी आवाज उठवला. मात्र लोकप्रतिनिधी आणि सरकार नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत.”
सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या धोरणांवर तीव्र टीका करत, “सरकारने सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा उद्योग तात्काळ थांबवावा, अन्यथा येत्या काळात सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही दिला आहे.
या प्रकरणामुळे म्हसवड परिसरात स्मार्ट मीटरविषयी पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, पुढील 24 तासांत काय निर्णय घेतला जातो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
