तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा लोकहिताच्या दृष्टीने आंदोलन करू : विठ्ठल शिंदे सांगोला : सांगोला शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सांगोला नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झालेला नसला, तरी तो विस्कळीत झाला असून, येत्या ३ ते ४ दिवसांनी पाणीपुरवठा होईल, असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, पाण्यासाठी नागरिकांना इतकी प्रतीक्षा करावी लागणे ही चिंतेची बाब असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका विठ्ठल शिंदे यांनी मांडली.पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करावा. दुरुस्तीला वेळ लागणार असल्यास नागरिकांसाठी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आणि आपत्कालीन नियोजन करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.पाणीपुरवठा सात दिवसांच्या आत सुरळीत न झाल्यास नागरिकांकडून आकारण्यात येणारी एका महिन्याची पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणीही विठ्ठल शिंदे यांनी केली आहे.नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी. पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरपालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल केदार, मनसेचे दत्ता पवळ, अमोल वाघमारे तसेच मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Post navigation संस्कारांची ७५ वर्षे आणि तुकोबांच्या विचारांचा महाजागर; सांगोला विद्यामंदिरमध्ये ऐतिहासिक महाग्रंथदान सोहळा संपन्न पंढरपूरमध्ये सहा दिवसीय मोफत आरोग्य शिबिराला उत्साहात सुरुवात; पहिल्याच दिवशी रुग्णांचा उस्फूर्त प्रतिसाद