संस्कारांची ७५ वर्षे आणि तुकोबांच्या विचारांचा महाजागर; सांगोला विद्यामंदिरमध्ये ऐतिहासिक महाग्रंथदान सोहळा संपन्न


​सांगोला ( प्रतिनिधी)
​ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आणि शैक्षणिक प्रगतीत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला विद्यामंदिरने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.ज्ञानदानाचे आणि संस्कारांचे अविरत ७५ वर्षे (अमृतमहोत्सव) पूर्ण करणाऱ्या या गौरवशाली संस्थेने केवळ बौद्धिक शिक्षणच दिले नाही तर पिढ्यानपिढ्या सुसंस्कृत, प्रामाणिक आणि देशप्रेमी नागरिक घडवत विद्यार्थ्यांच्या मनावर उच्च नैतिक मूल्ये व उत्तम संस्कार रुजवले आहेत. याच ७५ वर्षांच्या समृद्ध संस्कारांच्या वारशाला अधिक समृद्ध करण्यासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला,श्रीमुनी गणपत घेरडे मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट व जगद्गुरु श्री‌.संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने ऐतिहासिक ‘अभंग पंचविशी व ‘तुकाराम गाथा’ ग्रंथदान सोहळा’ (वारी आपल्या दारी) अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
​कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर या ज्ञानयज्ञातील पवित्र ग्रंथ ठेवलेली पालखी जेव्हा टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि वारकरी पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या सोबतीने व्यासपीठापर्यंत आली तेव्हा संपूर्ण परिसर भक्तीमय होऊन गेला. विशेष म्हणजे या मंगल सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी स्वतः या वारकरी पालखीला खांदा देऊन वारकरी परंपरेप्रती असलेली आपली श्रद्धा व आदर व्यक्त केला ज्याने उपस्थितांची मन जिंकली. त्यानंतरच्या
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये अमृतमहोत्सवी ७५ वर्षांच्या प्रवासात संस्थेने विद्यार्थ्यांच्या मनावर उच्च संस्कार व नैतिक मूल्यांची वीण कशी घट्ट केली आहे यावर प्रकाश टाकत या कार्यक्रमाच्या माध्यमातून संतांचे प्रगल्भ विचार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रुजवण्याचा मुख्य हेतू विशद करत त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
​या प्रेरणादायी सोहळ्याला अध्यक्ष म्हणून पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून सांगोल्याच्या तहसीलदार बाळुताई भागवत यांनी उपस्थिती होती.यावेळी व्यासपीठावर अविनाश काकडे, डॉ.राजाराम व्हनमाने, सचिन खरात,विशाल चौधरी,प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,डॉ.सुदर्शन घेरडे,ह.भ.प.अशोकराव काळे,डॉ.निकिता देशमुख,शीलाकाकी झपके,ॲड निरज धुमाळ,नागनाथ गायकवाड, प्राचार्य चारुदत्त जगताप उपस्थित होते. ग्रंथदान सोहळ्याचे मर्म आणि महती वारी आपल्या दारी मार्गदर्शक अविनाश काकडे व जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान पुणे अध्यक्ष ह.भ.प. अशोकराव काळे यांनी आपल्या निवेदनातून विषद केले.व
​अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या महाग्रंथदान सोहळ्याच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यामंदिर परिवार प्रशासकीय अधिकारी यांना ‘तुकाराम गाथा’ व विद्यार्थ्यांना संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर आधारित ‘अभंग पंचविशी’ग्रंथ प्रदान करण्यात आले व नंतर विद्यामंदिर परिवारातील दहा हजार विद्यार्थ्यांना अभंग पंचविशी व तीनशे पन्नास पेक्षा जास्त शिक्षकांना तुकाराम गाथा ग्रंथ प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला पदाधिकारी, विद्यामंदिर परिवार सर्व प्रशासकीय अधिकारी,श्रीमुनी गणपत घेरडे मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान, पुणे पदाधिकारी सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव विभाग प्रमुख नरेंद्र होनराव,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण,उन्मेश आटपाडीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमुनी गणपत घेरडे मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट सचिव डॉ.सुदर्शन घेरडे यांनी मानले.
​
​ सांगोला विद्यामंदिरच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाची शिस्त,शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड समर्पण आणि शाळेचे उच्च शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यश मी प्रत्यक्ष जवळून अनुभवले आहे. अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या भव्य ग्रंथदान सोहळ्यात विद्यार्थ्यांना तुकोबांची ‘अभंग पंचविशी’ आणि शिक्षकांना ‘गाथा’ रूपी ज्ञानप्रसाद वाटप करणे हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे. आजची तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आभासी जगात अडकली असून, अनेकदा तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे नैराश्यासारखे प्रश्न निर्माण होतात. परंतु आपल्या संस्कृतीने आणि संतांनी दिलेली शिकवण आपल्याला संयम,जिद्द आणि कष्टाचे महत्त्व शिकवते. कोणतीही मोठी गोष्ट सहजासहजी मिळत नाही त्यासाठी सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक कष्टाची जोड द्यावीच लागते. सांगोला विद्यामंदिरने अमृतमहोत्सवी वर्षात हाती घेतलेला संत विचारांचा हा ठेवा केवळ वाचण्यासाठी नसून तो आपल्या आचरणात आणण्यासाठी आहे. या माध्यमातून एक उत्तम विद्यार्थी एक सक्षम तरुण आणि एक आदर्श समाज घडवण्याच्या या पवित्र प्रवासात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे. — बसवराज शिवपुजे पोलीस उपअधीक्षक , कार्यक्रम अध्यक्ष


​
​आज सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या अमृतमहोत्सवी वर्षात आयोजित झालेला हा ‘अभंग पंचविशी व ग्रंथदान सोहळा’ माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदाचा क्षण ठरला. ज्या संस्थेने ७५ वर्षांत पिढ्यानपिढ्या सुसंस्कृत नागरिक घडवले, त्याच प्रांगणात संत साहित्याचा असा भव्य सोहळा अनुभवणे हा एक सुवर्णयोग आहे. आजच्या धकाधकीच्या आणि डिजिटल युगात तरुण पिढीसमोर नैराश्य व करिअरच्या ताणतणावासारख्या अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अशा वेळी संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्यांचे प्रगल्भ विचार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत मोलाचे ठरतात. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ हा तुकोबारायांचा संदेश केवळ पुस्तकी नसून तो जगण्याचा खरा मार्ग आहे. अमृतमहोत्सवाच्या या पवित्र पर्वावर शाळांच्या माध्यमातून हा वैचारिक वारसा थेट विद्यार्थ्यांच्या हातात सोपवला जात आहे, हे या संस्थेचे खरे यश आहे. या महायज्ञाचे फलित म्हणजे उद्याची सुसंस्कृत, प्रामाणिक आणि देशप्रेमी पिढी तयार होईल, यात शंका नाही.
— बाळुताई भागवत (तहसीलदार, सांगोला, प्रमुख पाहुणे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *