म्हसवड | दि. १० सप्टेंबर २०२६ बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी सातारा पूर्व अंतर्गत बीट म्हसवड यांच्या वतीने आज दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी अंगणवाडी वेलकम मेळाव्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. बालकांचा सर्वांगीण विकास आणि पालकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास म्हसवड नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा सौ. पूजा विरकर, उपनगराध्यक्षा सौ. श्रीदेवी पिसे, बालकल्याण सभापती सौ. दीपाली शिंदे, नगरसेविका सौ. सविता मासाळ, नगरसेवक डॉ. सतीश मासाळ, माजी नगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ तसेच म्हसवड बीटच्या मुख्यसेविका सौ. रेखा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मेळाव्यात नवचेतना व आधारशिला अभ्यासक्रमावर आधारित विविध शैक्षणिक उपक्रमांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. बोगदा, सेल्फी पॉइंट, सर्जनशील विकास, भाषिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास तसेच विज्ञान संकल्पनांवर आधारित शैक्षणिक साहित्याचे स्टॉल पालक व बालकांसाठी विशेष आकर्षण ठरले. प्रत्येक स्टॉलवर पालक आणि बालक आनंदाने विविध खेळ व उपक्रमांमध्ये सहभागी होताना दिसून आले. यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ. पूजा विरकर म्हणाल्या की, “अशा प्रकारचे उपक्रम बालकांच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासाला चालना देणारे असून अंगणवाडी शिक्षण अधिक प्रभावी बनवतात.” तर माजी नगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ यांनी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या समर्पित सेवाभावाचे अभिनंदन केले. कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत सेविका कुसुम मासाळ यांनी केले. सूत्रसंचालन सेविका शमीम सय्यद यांनी केले, तर आभार प्रदर्शन सेविका अश्विनी फुटाणे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. Post navigation क्रांतिवीर शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरण पूरक गणपती जिल्हा परिषद राबवणार स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना;