तरुणांनी रोहित कलढोणेंचा आदर्श घ्यावा – सपोनि संदिप पोमण १५ वर्षांच्या जिद्दीला अखेर यशाची गवसणी! तरुणांनी रोहित कलढोणेंचा आदर्श घ्यावा: सपोनि संदीप पोमण म्हसवड: वार्ताहर… सतत १५ वर्षे अपयशाचे चटके सहन करूनही खचून न जाता एमपीएससी (MPSC) परीक्षेत उत्तुंग यश मिळवणारे रोहित नंदकुमार कलढोणे यांची जी.एस.टी. अधिकारी (GST Officer) पदी निवड झाली आहे. या निमित्ताने अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या शुभहस्ते पार पडला. सत्कारप्रसंगी बोलताना सपोनि संदीप पोमण म्हणाले, “रोहित यांच्या दुर्दैवाने काही संधी हुकल्या, पण ते निराश न होता सातत्याने परीक्षा देत राहिले. अपयश आले की आजचा तरुण लगेच टोकाचा पाऊल उचलतो किंवा आत्महत्येचा विचार करतो. मात्र तरुण पिढीने खचून न जाता रोहित कलढोणे यांच्या संघर्षाचा व जिद्दीचा आदर्श घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे.” तसेच, गेली १५ वर्षे रोहित यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचेही त्यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांचे विचार: नितिनभाई दोशी (संस्थापक अध्यक्ष, अहिंसा पतसंस्था): “रोहितच्या यशाला १५ वर्षांच्या संघर्षाची किनार आहे. जी.एस.टी. अधिकारी होणे म्हणजे देशसेवेचाच भाग आहे, कारण या करातूनच देशाचा विकास होतो.” आण्णासाहेब टाकणे (ज्येष्ठ पत्रकार): “अहिंसा पतसंस्थेने नेहमीच गुणवंतांचा सन्मान करण्याचा वसा जपला आहे. रोहितच्या या यशात त्याच्या अध्यात्मिक कौटुंबिक पार्श्वभूमीचा व वडिलांच्या साथीचा मोठा वाटा आहे.” महावीर विरकर (नगरसेवक): “रोहितने मिळवलेल्या या यशामुळे म्हसवडच्या वैभवात मोलाची भर पडली असून सर्व म्हसवडकरांना त्याचा अभिमान वाटतो.” या सोहळ्यास म्हसवड नगरपरिषदेचे आरोग्य सभापती विजयशेठ बनगर, संचालक महावीर व्होरा, सुजय दोशी, नंदकुमार कलढोणे, सागर वेदपाठक, सागर पोरे, अझर मुजावर, पप्पू बाबर, राजू शहा यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी केले. Post navigation पळसावडे जिप शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून ४३ इंची एल ई डी टीव्ही भेट उमरगा जनता बॅकेला नवीन ईमारत,२४२ कोटीच्या ठेवी,उत्कृष्ट आँडीट वर्ग मिळवत प्रगतीचा चढता आलेख-चेअरमन शरण पाटील