पळसावडे जिल्हा परिषद शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून ४३ इंची एल ई डी टीव्ही भेट

स्वातंत्र्यदिनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन

विशाल माने
देवापूर प्रतिनिधी :

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळसावडे येथे एक स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम पार पडला. शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या मातृसंस्थेप्रति सामाजिक बांधिलकी जपत शाळेला अत्याधुनिक ४३ इंची एल ई डी टीव्ही भेट देत स्वातंत्र्य दिनी सामाजिक कर्तव्यचे दायित्व जपले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजरोहण व सत्कार समारंभादरम्यान हा डिजिटल टीव्ही शाळा व्यवस्थापन व शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आला.आपल्या गावातील आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी डिजिटल युगात मागे राहू नये, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने पळसावडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विध्यार्थी सुनील पांडुरंग सरतापे (मॅनेजिंग डायरेक्टर, गौरीशंकर एज्युकेशन व डायग्नोस्टिक सेंटर, सातारा), जगनशेठ गोपाळ यादव, तुकाराम बबन शेळके यांनी योगदान दिले.

स्मार्ट टीव्हीमुळे आता पळसावडे शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग, शैक्षणिक व्हिडिओ, ॲनिमेशन आणि विविध शैक्षणिक ॲप्सच्या माध्यमातून शिकण्याची संधी मिळणार आहे. माजी विद्यार्थ्यांच्या या मोलाच्या मदतीमुळे शाळेतील डिजिटल शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्यक्त केला.

चौकट :

*”आम्ही ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचे कर्ज फेडणे हे आमचे कर्तव्य आहे. आजच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठीच आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे.

श्री. सुनील पांडुरंग सरतापे (माजी विद्यार्थी)**
>
स्वातंत्र्यदिनाच्या या शुभप्रसंगी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *