वडूज (प्रतिनिधी): तडवळे (ता. खटाव) येथील नियोजित ग्रामसभेच्या तारखेवरून सध्या गावात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीतर्फे २१ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, ही सभा २२ ऑगस्ट रोजी घेण्यात यावी, अशी जोरदार मागणी तडवळे येथील ‘युवाशक्ती’च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामस्थ व युवकांनी ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामसेवक यांना नुकताच एक विनंती अर्ज सादर केला आहे.

२१ ऑगस्ट रोजी सभा घेतल्यास कामाच्या अथवा इतर कारणांमुळे अनेक ग्रामस्थ आणि तरुणांना उपस्थित राहणे शक्य होणार नाही. गावाच्या विकासात युवकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने सर्वांना सोयीच्या ठरणाऱ्या २२ ऑगस्ट या तारखेलाच ग्रामसभा पार पडावी, असा मुद्दा या अर्जाद्वारे मांडण्यात आला आहे.

आता ग्रामपंचायत प्रशासन २१ ऑगस्टच्या तारखेवर ठाम राहणार की युवाशक्तीच्या मागणीचा विचार करून २२ ऑगस्ट रोजी सभा घेणार, याविषयी संपूर्ण तडवळे परिसरात चर्चा रंगली असून सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.

दरम्यान, ग्रामसभेची तारीख अखेर कोणतीही ठरली तरी गावातील प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवाशक्तीच्या प्रतिनिधींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *