म्हसवड पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल; पानवणच्या एजंटसह टोळीचा पर्दाफाश दहिवडी (प्रतिनिधी: एकनाथ वाघमोडे): उपविभागीय अधिकारी (प्रांत) कराड यांच्या नावाची बनावट सही, बोगस डिजिटल स्वाक्षरी व शिक्के तयार करून शासकीय जमिनीची नोंदणी आणि फेरफार करून घेण्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात गाजलेल्या बनावट डॉ. नाना शिंदे अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार संजय किसन शिंदे (रा. पानवण, ता. माण) याने प्रांताधिकाऱ्यांचा बनावट शिक्का व डिजिटल सहीचा आदेश तयार करून फलटण येथे बोगस दस्त नोंदवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या बनावट दस्तऐवजांच्या आधारे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची व शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल २०२६ ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पानवण व वरकुटे-मलवडी (ता. माण) येथे हा फसवणुकीचा प्रकार घडला. उपविभागीय अधिकारी कार्यालय कराड यांनी निर्गमित न केलेल्या आदेशाचा (क्र./पुनर्व/तारळी/जांभे/एसआर-६/२०२६, दि. २८/०२/२०२६) वापर करून, तो खरा असल्याचे भासवण्यात आले. या बनावट आदेशाच्या आधारे: ग्राम महसूल अधिकारी, पानवण यांच्याकडे नोंद करण्यात आली. मंडल अधिकारी वरकुटे-मलवडी यांच्याकडून फेरफार क्रमांक ३६९९ मंजूर करून घेतला गेला. मौजे पानवण येथील गट क्रमांक ७९९ मधील २.४० हे.आर. शासकीय जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवून सातबारा उताऱ्यावर नावे नोंदवण्याचा प्रयत्न झाला. सह दुय्यम निबंधक कार्यालय, फलटण क्र. २ येथे बनावट दस्त नोंदवून शासकीय जमिनीची खरेदी-विक्री करण्याचा घाट घातला गेला. पाच जणांवर गुन्हे दाखल कराड उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी विश्वजीतसिंह राजारामसिंह राजपूत (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसवड पोलिसांत ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.१२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावे: संजय किसन शिंदे (रा. पानवण, ता. माण) मारुती भैरू कदम अविनाश गोविंद कदम द्रौपदा गोविंद कदम / प्रकाश मारुती सपकाळ (रा. जांभे, ता. जि. सातारा) विनोद ज्ञानदेव आठपाडकर (रा. वरकुटे-मलवडी, ता. माण) या सर्वांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(१), ३४०(२), ३५१ आणि IPC ४२० अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक (सपोनि) पोमण हे अधिक तपास करत आहेत. बनावट आदेश, डिजिटल स्वाक्षरी, बनावट शिक्के आणि जमिनीचे दस्तऐवज यांची सखोल पाहणी सुरू आहे. यामागे एक मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, इतरही दलाल व संशयित आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. “या प्रकरणाचा अत्यंत जलद गतीने आणि निष्पक्ष तपास सुरू आहे. शासकीय कार्यालयांची फसवणूक करणाऱ्या किंवा बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, प्रत्येकावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.” — अतुल म्हेत्रे (उपविभागीय अधिकारी, कराड) Post navigation मंगळवेढ्यात म्हैसाळच्या पाच टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश सौ.सोनियाताई गोरे यांची अपघातग्रस्त महिलेला मदत…