मुलाच्या लग्नाचे आमिष दाखवून वृद्ध दांपत्याची २५ लाखांची फसवणूक; अश्लील व्हिडिओची भीती दाखवून धमकावले

..म्हसवड (तालुका माण) : वार्ताहर..

मुलाच्या लग्नासाठी स्थळ शोधून लग्न लावून देण्याचे गोड बोलून आमिष दाखवत एका ९० वर्षीय वृद्धाची आणि त्यांच्या पत्नीची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मस्करवाडी (ता. माण) येथे उघडकीस आला आहे. अश्लील व्हिडिओची भीती दाखवून व पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देऊन ही उकळपट्टी करण्यात आली असून, याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

म्हसवड पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मस्करवाडी येथील तक्रारदार सीताराम शिवराम सूर्यवंशी (वय ९०, व्यवसाय : शेती) यांना संशयित आरोपींनी मुलाच्या लग्नासाठी मुलगी पाहून लग्न लावून देतो, असे सांगून विश्वासात घेतले. माहे एप्रिल २०२६ ते २५ जुलै २०२६ या कालावधीत संशयितांनी आपापसांत संगनमत करून तक्रारदार व त्यांच्या पत्नी सुमन सूर्यवंशी यांना वेळोवेळी विविध कारणे सांगून २५ लाख रुपये देण्यास भाग पाडले.
पैसे उकळल्यानंतर संशयितांनी “तुमचा अश्लील व्हिडिओ काढला आहे, तुमच्यावर पोलीस केस करू आणि बदनामी करू,” अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर, “तुम्हाला पिंजऱ्याच्या गाडीतून पोलीस घेऊन जातील,” अशी भीती घालून त्यांना मानसिक त्रास दिला आणि पैशांची फसवणूक केली.

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी सीताराम सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसवड पोलिसांनी खालील चार जणांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे:

  1. पांडुरंग लाला आवळे
    (रा. गंगोती, ता. माण)
  2. ** अनिता शिवराज सुतार** (रा. पिलीव, ता. माळशिरस)
  3. नितिन अरुण शिंदे
    (रा. म्हसवड, ता. माण)
  4. देवदास ज्ञानेश्वर तुपे
    (रा. पाणवण, ता. माण)

*पोलीस तपास सुरू
या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०७/२०२६ नुसार BNS ३०८(२), ३१८(४), ३५१(२), आणि ३(५) अन्वये करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी (दहीवडी कॅम्प वडूज) मा. सावंत साहेब आणि म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमण साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार खाडे (बकल नं. ३७६) करत आहेत.
.. ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *