चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

सांगोला ; तालुका प्रतिनिधी

मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कौतुक केले आहे. अत्यंत प्रभावी आणि व्यापकपणे या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शुक्रवार दि २४ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे या ट्रस्टचे विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आदीसह मान्यवर उपस्थित होते.

राज्यात पंढरीच्या पांडुरंगाची वारीला शेकडो वर्षांची परंपरा आणि इतिहास आहे. खांद्यावर भगवी पताका गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, हातात टाळ-मृदंग, ओठांवर ‘विठ्ठल विठ्ठल’चा अखंड गजर आणि मनात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ अशी लाखो वारकऱ्यांची पावले आषाढी एकादशीला पंढरीकडे वळतात. जात, धर्म, श्रीमंती-गरीबीचे भेद विसरून सर्वजण एका भक्तीच्या धाग्यात बांधले जातात. उन्हाची तमा नाही, पावसाची पर्वा नाही फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात घेऊन पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची आपण चरणसेवा केली पाहिजे हा विचार राज्यात सर्वात प्रथम ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या मनात आला त्यातून त्यांनी पाचेगाव ता. सांगोला येथे गेल्या १५ वर्षापूर्वी दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही संकल्पना सत्यात उतरवली. पंढरीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला आयुर्वेदिक तेल लावून पायांची मालिश करणे, वारकऱ्यांचे पाय चेपणे या चरणसेवेची सुरुवात शारदादेवी साळुंखे पाटील यांनी केली होती. ही संकल्पना जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना समजली तेव्हा संपूर्ण राज्यभर अत्यंत प्रभावीपणे ही संकल्पना राबवून वारकऱ्यांची चरणसेवा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला.
सालाबादप्रमाणे पाचेगाव ता सांगोला येथे होणाऱ्या दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि यंदा प्रथमच मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा सांगोला येथे २२ आणि २३ जुलै रोजी आयोजित केलेल्या चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरात सुमारे ५० हजाराहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा येथे दोन दिवस माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांची चरणसेवा केली होती या शिबिराचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची आरोग्यसेवा देखील करण्यात आली होती. या शिबिराचे यशस्वीपने आयोजन करून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून केलेल्या कामाचे कौतुक केले.

१) चरणसेवा संकल्पनेच्या जनक ; ह.भ.प. भागवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील

फोटो ओळ ; आषाढी वारीमध्ये विक्रमी चरणसेवा केल्याबद्दल कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यावेळी उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आणि राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *