म्हसवड, प्रतिनिधी :म्हसवड शहराचा स्वातंत्र्यलढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरवशाली इतिहास जतन करण्यासाठी शहरातील स्वातंत्र्यसैनिक हरी गोविंद रसाळ तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा किसन विरकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे. तसेच म्हसवड नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील दर्शनीय ठिकाणी त्यांच्या प्रतिमा लावून त्यांच्या कार्याची माहिती प्रदर्शित करण्यात यावी, अशी मागणी म्हसवड नगर परिषदेचे नगरसेवक विजय रामचंद्र धट यांनी केली आहे. नगरसेवक विजय धट यांनी सांगितले की, स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत म्हसवड शहरातील अनेक सुपुत्रांनी मोठे योगदान दिले आहे. मात्र आज त्यांच्या कार्याचा पुरेसा गौरव होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी शहरात स्मारक उभारणे आणि नगरपरिषदेत त्यांच्या प्रतिमा लावणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यसैनिक हरी गोविंद रसाळ यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध राष्ट्रीय चळवळींमध्ये सहभाग घेत जनजागृतीचे कार्य केले. त्यांचे राष्ट्रप्रेम आणि समाजसेवा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा किसन विरकर यांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात म्हसवडचे नाव अभिमानाने घेतले जाते. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यासाठी १०५ हुतात्म्यांच्या त्यागात त्यांचेही योगदान अमूल्य मानले जाते. नगरसेवक विजय धट यांनी शासन, जिल्हा प्रशासन आणि म्हसवड नगर परिषद यांनी संयुक्तपणे या दोन्ही महान व्यक्तींचे स्मारक उभारून त्यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त अधिकृत कार्यक्रम आयोजित करावेत, अशी मागणी केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आपल्या शहरातील स्वातंत्र्यवीरांचा इतिहास जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यांच्या कार्याचा गौरव झाल्यास भावी पिढीला राष्ट्रप्रेम, त्याग आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळेल. ▣ चौकट स्वातंत्र्यलढ्यातील अन्य मान्यवरांचाही सन्मान व्हावा नगरसेवक विजय रामचंद्र धट यांनी अशीही मागणी केली आहे की, म्हसवड शहरातील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक अप्पा दगड दहिवडे तसेच अनुसया आप्पा दहिवडे यांच्या प्रतिमादेखील म्हसवड नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील दर्शनीय ठिकाणी लावण्यात याव्यात. या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती फलकाच्या स्वरूपात प्रदर्शित करून त्यांच्या त्यागाचा गौरव करण्यात यावा. स्थानिक इतिहास जतन करण्यासाठी आणि भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. Post navigation माण गंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी येथे रंगला ‘लोकशाहीचा उत्सव’! म्हसवड वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नितीन दहिवडे; नवीन कार्यकारिणी जाहीर