मासाळवाडी:

येथील माणगंगा शैक्षणिक संकुल येथे इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ‘शिक्षक-पालक सहविचार सभेचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या सभेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, संस्थेचे समन्वयक श्री. राहुल फुटाणे सर आणि प्राचार्य श्री. रावसाहेब मासाळ सर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी चालू शैक्षणिक वर्षासाठी नवीन पालक प्रतिनिधींची एकमताने निवड करण्यात आली.
विविध वर्गांच्या पालक प्रतिनिधींची निवड
सभेमध्ये शाळा आणि पालकांमधील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी खालील पालकांची ‘पालक प्रतिनिधी’ म्हणून निवड करण्यात आली:

  • इयत्ता आठवी: श्री. भानुदास सुखदेव मासाळ
  • इयत्ता नववी: श्री. दुर्योधन दादा खांडेकर
  • इयत्ता दहावी: श्री. दादा ज्ञानोबा कोडलकर आणि सौ. संगीता धुळा मासाळ
    सभेच्या सुरुवातीला प्राचार्य श्री. रावसाहेब मासाळ यांनी मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा व शालेय उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच आगामी संपूर्ण वर्षाचे शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक नियोजन पालकांसमोर मांडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
    संस्थेचे समन्वयक श्री. राहुल फुटाणे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या करिअरच्या विविध संधींवर प्रकाश टाकला.

“सध्याच्या स्पर्धात्मक युगात मुलांवरील मानसिक तणाव दूर करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पालकांनी मुलांशी संवाद वाढवून त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक पाठबळ दिले पाहिजे,” असे फुटाणे सर आपल्या भाषणात म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसंत मासाळ यांनी संस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले,

“माणगंगा शैक्षणिक संकुलाचे लावलेले छोटेसे रोपटे आज आपल्या सर्वांच्या कष्टाने व विश्वासाने एक मोठा वटवृक्ष बनले आहे. ही प्रगती साधताना शिक्षक आणि पालकांनी आपापली कर्तव्ये चोख बजावणे गरजेचे आहे.”

यावेळी डॉ. मासाळ यांनी पालकांनी मांडलेल्या विविध सूचना व अडचणी ऐकून घेतल्या आणि त्यावर योग्य व सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.सूत्र संचालनाची धुरा श्री. भगवान सजगाने सर यांनी सांभाळली.
या सहविचार सभेला इयत्ता आठवी ते दहावीचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणात ही सभा पार पडली. आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *