जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; रहिवासी व बेरोजगार युवकांच्या हिताचा प्रश्न ऐरणीवर म्हसवड, प्रतिनिधी : म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यावसायिक गाळ्यांच्या वाटपामध्ये स्थानिक रहिवाशांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करत म्हसवड येथील किशोर भोजलिंग सोनवणे यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनामुळे गाळे वाटपाच्या प्रक्रियेबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे. निवेदनात म्हटले आहे की, म्हसवड नगरपरिषद क्षेत्रातील नागरिक अनेक वर्षांपासून शहराच्या विकासासाठी योगदान देत आहेत. नगरपरिषदेसमोरील नव्याने बांधण्यात आलेले गाळे लवकरच वितरित होणार असून, या गाळ्यांच्या वाटपावेळी स्थानिक रहिवाशांच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. म्हसवड हे कायम दुष्काळग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अशा परिस्थितीत स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेच्या गाळ्यांचे वाटप स्थानिकांना प्राधान्याने करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनकर्त्यांनी असेही म्हटले आहे की, शहरातील अनेक तरुण स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना नगरपरिषदेचे गाळे उपलब्ध झाल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळेल तसेच त्यांच्या कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. बाहेरगावच्या व्यक्तींना गाळे देण्यात आल्यास स्थानिक युवकांच्या संधी कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांमधून रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन दिले जात असताना, सर्वसामान्य व गरजू कुटुंबांचा विचार करून गाळे वाटपाचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. विशेषतः महिलांना व रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत जाणाऱ्या युवकांना स्थानिक स्तरावर व्यवसायाची संधी मिळावी, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. किशोर सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित प्रशासनाकडे गाळे वाटप प्रक्रियेत स्थानिक रहिवाशांना प्राधान्य देण्याची मागणी केली असून, याबाबत योग्य निर्णय घेतल्यास शहरातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. Post navigation विद्यार्थ्यानी वर्गात नियमित हजर राहून स्पर्धा परीक्षा तयारी केल्यास करिअर घडवतील.प्राचार्य डॉ संजय अस्वले *माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी म्हसवड येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा;