म्हसवड पोलिसांची कर्णकर्कश आवाजाच्या मोटारसायकलींवर धडक कारवाई.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४० वाहनधारकांकडून २६ हजारांचा दंड म्हसवड : वृत्तसेवा -म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या आदेशान्वये विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली. विशेषतः कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेंसर असलेल्या मोटारसायकलींवर पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे.नाकाबंदी दरम्यान दारू पिऊन वाहन चालविणे, बेदरकार वेगाने वाहन चालविणे, विनानंबर प्लेट, बनावट नंबर प्लेट, विनाहेल्मेट वाहन चालविणे तसेच काळ्या काचा असलेल्या वाहनांची तपासणी करण्यात आली. संशयित वाहनांचीही सखोल चौकशी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी स्वतः उपस्थित राहून कारवाईचे नेतृत्व केले. त्यांच्यासह पोपट चव्हाण, रणजित खाडे, महावीर कोकरे, श्रीकांत सुंद्रीक, युवराज खाडे आणि वसीम मुलाणी या पोलिस कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली.या विशेष कारवाईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४० वाहनधारकांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर बसवून वाहन चालविणाऱ्या तीन बुलेट मोटारसायकलींचे सायलेंसर जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून नियम मोडणाऱ्यांविरोधात भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. वाहतुकीचे योग्य नियमन व वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, म्हसवड पोलिसांच्या या कारवाईबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून वाहतूक शिस्तीसाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची मागणी होत आहे. Post navigation देशातील शेतकरी अन्नदाता सोबतच ऊर्जा व इंधन दाता झाला पाहिजे– नितीन गडकरी सर्वसामान्यांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणारा सोनोरी हद्दीचा जननायक