आटपाडीच्या मातीतला लेखक राज्यभर गाजलालेखक विलास खरात यांच्या ‘आकुबा’ कथासंग्रहाला राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याची माती ही कष्ट, संघर्ष, लोकसंस्कृती आणि ग्रामीण जीवनाच्या अस्सल वास्तवाने समृद्ध आहे. याच मातीतून अनेक कलावंत, साहित्यिक आणि सामाजिक जाणिवा जपणारे व्यक्तिमत्त्व घडले. आता या परंपरेत आणखी एका नावाची भर पडली असून आटपाडीचे युवा लेखक विलास खरात यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर राज्यस्तरावर मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या ‘आकुबा आणि इतर कथा’ या कथासंग्रहास प्रतिष्ठेचा १६ वा राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून साहित्य क्षेत्रात त्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे.ग्रामीण जीवनातील उपेक्षितांचे जगणे, गावकुसाबाहेरील माणसांचे भावविश्व, नातेसंबंधातील गुंतागुंत आणि समाजातील वास्तव यांना खरात यांनी आपल्या कथांमधून प्रभावी शब्द दिले आहेत. त्यामुळे ‘आकुबा’ हा केवळ कथासंग्रह न राहता ग्रामीण संस्कृतीचा जिवंत दस्तऐवज ठरला आहे. मातीचा गंध, माणसांच्या वेदना, संघर्ष आणि जीवनाची खरी चव त्यांच्या कथांमधून प्रकर्षाने जाणवते.वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी ग्रामीण लोकजीवन, संस्कृती आणि साहित्य यांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या साहित्यकृतींना ‘राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रभरातून तब्बल ७५ हून अधिक साहित्यकृती या पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या. या स्पर्धात्मक निवड प्रक्रियेत विलास खरात यांच्या ‘आकुबा आणि इतर कथा’ या कथासंग्रहाने पहिल्याच प्रयत्नात मानाचे स्थान पटकावत साहित्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.विशेष म्हणजे, हा खरात यांचा पहिलाच साहित्यिक प्रयत्न असून पहिल्याच प्रयत्नात राज्यस्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या लेखनशैलीची आणि साहित्यिक क्षमतेची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील लेखकाला आपल्या मातीतल्या कथा घेऊन राज्यस्तरावर पोहोचता येते, हे खरात यांच्या यशामुळे अधोरेखित झाले आहे.पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भावना व्यक्त करताना विलास खरात म्हणाले,“ग्रामीण जीवनातील उपेक्षितांच्या वेदना, त्यांचे संघर्ष आणि त्यांचं भावविश्व ‘आकुबा’च्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. पहिल्याच प्रयत्नात राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड होणे, हा माझ्या लेखणीचा आणि माझ्या मातीतल्या संस्कारांचा सन्मान आहे. या यशामुळे माझी लेखकीय जबाबदारी अधिक वाढली आहे.”त्यांच्या या यशामुळे आटपाडी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून साहित्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. योगीराज वाघमारे, सुहास घुमरे, डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ यांच्यासह अनेक साहित्यप्रेमींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील लेखकाला मिळालेला हा सन्मान म्हणजे संपूर्ण आटपाडी तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.यंदाच्या पुरस्कारांमध्ये इतरही अनेक साहित्यिकांचा गौरव करण्यात येणार आहे. मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार मिथुन चंद्र चौधरी यांच्या ‘आतली कवाडं’ आणि संध्या लगड यांच्या ‘पुसट सावल्या गडद काळ’ या साहित्यकृतींना जाहीर झाला आहे. तसेच मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या ‘पीळ’ कादंबरीला, मुकूंदराज कुलकर्णी यांच्या ‘नाथ मंदिरांतील दिवस’, विलास सिदंगीकर यांच्या ‘सणोत्सव’ आणि आशा नेगी यांच्या ‘लव इज लव’ या साहित्यकृतींना जाहीर झाला आहे.प्रा. भास्कर भंगाळे यांच्या ‘आस्वाद साहित्याचा’ या ग्रंथाला मातोश्री चांगुणाबाई सिद्राम इंगळे स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून संपादन ग्रंथ विभागात वंदना कुलकर्णी यांच्या ‘सोलापूरची काव्यप्रभा’ आणि रमाकांत नारायणे यांच्या ‘ढोर समाज आणि समाजाचे शिल्पकार’ या ग्रंथांचाही गौरव करण्यात येणार आहे.या सर्व पुरस्कारांचे वितरण रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील सदाशिव पेठ येथील ‘अक्षरवेल’ सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. शाल, स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.ग्रामीण माणसांच्या भावभावनांना न्याय देणारी लेखणी, मातीतल्या वास्तवाला शब्द देणारा दृष्टिकोन आणि संवेदनशील कथनशैली यांच्या बळावर विलास खरात यांनी राज्य साहित्यविश्वात दमदार एन्ट्री केली आहे. आटपाडीच्या मातीतून उगवलेला हा साहित्यिक भविष्यात मराठी साहित्यविश्वात आणखी मोठा ठसा उमटवेल, अशी अपेक्षा साहित्यप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!