अखेर ‘सागर’ ची झुंज अपयशी…..

सोशल मीडियावर मदतीचा महासागर… पण सागर हरपला; तालुक्यात हळहळ

म्हसवड: सचिन शिंगाडे यांजकडून —-

माण तालुक्यातील धुळदेव येथील सागर प्रकाश रुपनवर (वय २४) याचा भीषण अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली असून, या घटनेने संपूर्ण तालुका आणि सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे.
अत्यंत गरीब व कष्टकरी कुटुंबातील सागर आणि त्याचा मोठा भाऊ पंकज प्रकाश रुपनवर हे दोघेही पुण्यात नोकरीस होते. पंकज हे पोलीस दलात कार्यरत असून, सागर खासगी कंपनीत नोकरी करत होता. आई-वडिलांच्या कष्टातून उभं राहिलेलं कुटुंब आता स्थिरावत असतानाच नियतीने घाला घातला.
दरवर्षीप्रमाणे धुळोबा देवाच्या यात्रेसाठी दोघे भाऊ पुण्यातून बुलेटवरून गावाकडे निघाले होते. मात्र पुणे–पंढरपूर महामार्गावरील बरड गावाजवळ अचानक समोर आलेल्या टेम्पोमुळे भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेही जखमी झाले. त्यांना तात्काळ फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पंकज यांची प्रकृती स्थिर होती, मात्र सागर गंभीर जखमी झाला होता. त्याचा एक पाय आणि एक हात मोडला होता, तसेच छातीवर झालेल्या जबर मारामुळे फुफ्फुस व हृदयाला गंभीर इजा झाली होती. डॉक्टरांनी तातडीने खर्चिक उपचारांची गरज असल्याचे सांगितले.
घटनेची माहिती समजताच गावकरी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी धाव घेतली. सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन करण्यात आले आणि पाहता पाहता मदतीचा अक्षरशः महासागर उसळला. हजारो हात सागरच्या मदतीसाठी पुढे आले. कुटुंब, गावकरी आणि मित्रपरिवार जीव तोडून प्रयत्न करत होते.
तब्बल दहा दिवस सागर मृत्यूशी झुंज देत होता. अखेर १४ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. “सागर वाचावा” या एकाच आशेवर डोळे लावून बसलेल्या कुटुंबीयांसह संपूर्ण तालुक्याचा आशेचा किरण क्षणात हरपला.
सागरच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ पंकज, आजी, चुलते, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात हळहळ व्यक्त होत असून सोशल मीडियावर श्रद्धांजलींचा पूर आला आहे.
दरम्यान, वेळेत अधिक योग्य उपचार मिळाले असते तर सागरचा जीव वाचला असता, अशी चर्चा सर्वत्र रंगली असून या घटनेने सर्वांच्या मनात वेदना निर्माण केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
पुणे जिल्ह्यात शेतकरी सेनेचे संघटन वाढवणार- कृषिरत्न विश्वंभर बाबर    |    17 रोजी शिरताव येथे महा राजस्व अभियान    |    मायणी येथील हनुमंत चव्हाण यांचे निधन    |    शिरताव येथे 17 रोजी महाराजस्व अभियान, सर्व प्रकारचे दाखले मिळणार.    |    क्रांतिवीर सीबीएसई स्कूलचे घवघवीत यश ,समर्थ मंगरुळे प्रथम क्रमांक    |    दहिवडी कृषी कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था    |    आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केली विविध ठिकाणची पाहणी    |    विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून प्रशांत माळवदे यांचा सन्मान    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!