वनखाते झोपेत , घोरपड हत्या, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात.

म्हसवड (वार्ताहर) —

माण तालुक्यातील बनगरवाडी गावात घोरपडीची शिकार केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील दोन मुलांनी घोरपड मारल्याचा आणि त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा दावा केला जात आहे. संबंधित व्हिडिओ अनेकांच्या मोबाईलवर इंस्टाग्राम वरती व्हायरल झाल्यानंतर वन्यजीव प्रेमी व नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
घोरपड ही वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित प्रजाती असल्याने तिची शिकार करणे हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, काही जागरूक नागरिकांनी या घटनेचे व्हिडिओ व पुरावे संबंधित वनरक्षकांकडे पाठवले होते, जेणेकरून दोषींवर कारवाई होईल. मात्र, घटनेला चार ते पाच दिवस उलटून गेले तरी अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याची चर्चा गावात सुरू आहे.

“पुरावे असूनही कारवाई होत नाही, हे दुर्दैवी आहे. जर वेळेत पावले उचलली नाहीत, तर अशा घटना वाढण्याची शक्यता आहे,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले.
तर दुसऱ्या एका ग्रामस्थाने सांगितले की,
“हा प्रकार व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे समोर आला. पण यापूर्वी अशा किती घटना घडल्या असतील, याचा अंदाज लावणेदेखील कठीण आहे.”

गावकऱ्यांमध्ये अशीही भावना व्यक्त केली जात आहे की, वन विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, कारवाईबाबत स्पष्टता नाही.
माण तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना आपल्या भागाचा वनरक्षक कोण आहे, याची माहिती नसल्याचेही समोर येत आहे. वन विभागाची प्रमुख जबाबदारी म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण, बेकायदेशीर शिकार रोखणे, तसेच जनजागृती करणे होय. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वन विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
पुणे जिल्ह्यात शेतकरी सेनेचे संघटन वाढवणार- कृषिरत्न विश्वंभर बाबर    |    17 रोजी शिरताव येथे महा राजस्व अभियान    |    मायणी येथील हनुमंत चव्हाण यांचे निधन    |    शिरताव येथे 17 रोजी महाराजस्व अभियान, सर्व प्रकारचे दाखले मिळणार.    |    क्रांतिवीर सीबीएसई स्कूलचे घवघवीत यश ,समर्थ मंगरुळे प्रथम क्रमांक    |    दहिवडी कृषी कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था    |    आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केली विविध ठिकाणची पाहणी    |    विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून प्रशांत माळवदे यांचा सन्मान    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!