म्हसवड…प्रतिनिधी
शेतकरी सेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना ताकद देऊन गाव पातळीवरील पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचा निर्धार शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील यांनी पुणे येथे व्यक्त केला.
शेतकरी सेनेच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पुणे येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील होते. यावेळी नाथराव कराड बीड, कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर सातारा, व रवींद्र मोरे अहमदनगर, हे तीन प्रदेश उपाध्यक्ष, पद्माकर मोराडे खजिनदार ठाणे, सरचिटणीस प्रल्हाद इंगोले नांदेड, राज्य सचिव जनार्दन पाटील कोल्हापूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने पुणे विभागाच्या वतीने कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून सन्मान केला.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले शेतकरी सेनेच्या माध्यमातून चळवळीच्या मुशीतील शेतकरी प्रतिनिधी कार्यकर्त्याला बळ दिले जाईल. समाजअंतर्गत द्वेष व राजकारणातील वस्त्रे बाजूला ठेवून केवळ शेतकरी हित जपण्यासाठी शेतकरी सेना प्राधान्य देणार आहे. संघटनेत सक्षम व काम करणाऱ्याला सन्मान व सक्रिय कार्यकर्त्याला पद देण्याची भूमिका राहणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार, व फसवणूक विरुद्ध आवाज उठवणे, शेती उपयोगी मात्र दुय्यम दर्जाच्या भेसळ युक्त खते, बियाणे व कीटकनाशक औषध याबाबत दक्ष राहणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान, पंचनामा व तातडीची मदत मिळवून देण्याबाबत पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शेतकरी सेनेसाठी गाव पातळीवर जास्तीत जास्त नवीन सभासद नोंदणी करणे, तालुका,जिल्हा व विभागीय समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना क्षमतेनुसार पदाधिकारी म्हणून सन्मान करण्याचा मनोदय जालंदर पाटील यांनी व्यक्त केला. पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे मजबूत काम करून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याबाबत मार्गदर्शन केले. शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना शेतकरी सेनेच्या माध्यमातून मजबूत ताकद देण्याचा निर्धार अध्यापक जालंदर पाटील यांनी व्यक्त केला. शेतकऱ्याचे थेट प्रतिनिधी म्हणून तालुका,जिल्हा व राज्य स्तरावर शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना फादर बॉडी बरोबरच बैठकीच्या वेळी सन्मान मिळणे गरजेचे असून विकास कामात सहभाग घेणे याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे सूचना केली जाईल याची ग्वाही पाटील यांनी दिली.
यावेळी पद्माकर मोराडे, नाथराव कराड , प्रा. विश्वंभर बाबर , प्रल्हाद इंगोले, रवींद्र मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी सेना कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. यावेळी राज्यातील शेतकरी सेना संघटन कार्याचा आढावा घेण्यात आला. राज्य सचिव जनार्धन पाटील यांनी बैठकीचे सूत्रसंचालन करून उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
शेतकरी सेनेच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करणार – प्रा. जालंदर पाटील
