म्हसवड (प्रतिनिधी):-
म्हसवड सारख्या ग्रामीण भागात
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील शिक्षण संस्था असून या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नाची पराकष्ट करून स्वतःची चांगली ओळख निर्माण करावी . या ठिकाणी सुरू केलेली सीबीएसई शिक्षण प्रणाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास केंद्रीय सेवेतील आयकर उप आयुक्त सचिन मोटे यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल संचलित क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड व क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयकर उपायुक्त मुंबई सचिन मोटे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर, संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, हनुमंत मोटे, संदीप पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आयकर उपायुक्त सचिन मोटे म्हणाले जीवनात नेहमी सकारात्मक रहा. उच्च ध्येय ठेवा. ध्येय प्राप्तीसाठी जिद्द चिकाटी बाळगा. अवांतर वाचनाची सवय लावून घ्या. अभ्यासाबरोबरच खेळामध्ये सुद्धा सहभागी राहा. थोरामोठ्याकडून प्रेरणा घ्या. ताण तणावापासून दूर राहण्यासाठी वाचन लेखन करून खेळात सहभागी व्हा. स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी स्वतःवर प्रेम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. प्रत्येकाला अधिकारी होणे जमले नाही तरी किमान चांगला माणूस होण्या साठी प्रयत्नशील राहा.माण तालुका व आटपाडी तालुक्याची नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती सारखीच आहे.
या ठिकाणचे अनेक विद्यार्थी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगामध्ये घवघवीत यश मिळवत आहेत. या विद्यार्थ्याकडून प्रेरणा व प्रोत्साहन घेण्याचे आवाहन मोटे यांनी केले. घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करा. तुमची शालेय युवा पिढी खूप नशीबवान आहे. तुम्हाला सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. संगणक, मोबाईल तसेच ए.आय.
सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून तुम्ही सर्व गुणसंपन्न झाले पाहिजे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. माण तालुका सारख्या ग्रामीण भागात तालुका विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांचे शैक्षणिक कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचे सांगून येथील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई शिक्षण प्रणाली क्रांतिकारी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. क्रांतिवीर शैक्षणिक संकुल आगामी काळात क्रांतिकारी आदर्श ज्ञानमंदिर बनेल असेही सचिन मोटे यांनी सांगितले
यावेळी कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी प्रास्ताविक करून संस्था रौप्य महोत्सवी कालावधीत कार्यरत असल्याचे सांगितले. या निमित्ताने त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीची, तसेच संस्थेअंतर्गत च्या विविध शाखांची माहिती तपशील निहाय उपस्थित मान्यवरांना दिली. प्रमुख पाहुणे सचिन मोटे यांचा सन्मान विश्वंभर बाबर व ॲड. इंद्रजीत बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थिततांचे आभार प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *