म्हसवड..प्रतिनिधी
परिस्थितीवर मात करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर माण तालुक्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होत असून माण ही नर रत्नाची खाण असल्याचे प्रतिपादन क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केले आहे.
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेचा माजी विद्यार्थी वैभव जिजाबा नरळे याची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून मंडल कृषी अधिकारी गट ब पदासाठी निवड झाल्याबद्दल शाळा प्रांगणात त्याचा सत्कार आयोजित केला.
होता. संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने व पूनम जाधव तसेच वैभव चे वडील जिजाबा नरळे सर व आई फुलाबाई, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विश्वंभर बाबर म्हणाले चालू शैक्षणिक वर्ष क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. क्रांतिवीर शाळेचे अनेक विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये चमकत असल्याचे दिसत आहे.
त्यापैकीच एक वैभव जिजाबा नरळे यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या कृषी परीक्षेत राज्यात 24 वा क्रमांक पटकवून आई वडील, गुरुजन व क्रांतिवीर शाळेचे नाव उज्वल केले आहे .
पुढे बोलताना विश्वंभर बाबर म्हणाले वैभव चा सत्कार समारंभ कार्यक्रम उपस्थित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व प्रोत्साहन देणारा ठरणारा आहे. प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा या भविष्यातील अनेक स्पर्धा परीक्षेचा पाय आहेत. त्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सहभागी असणे गरजेचे आहे. अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन करा. जिद्द चिकाटी ठेवा तसेच नेहमी सकारात्मक रहा. यशस्वी व्यक्तीकडून प्रेरणा घ्या. प्रयत्न केल्यास काहीही अवघड नाही हे माण तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आजवर दाखवून दिल्याचे प्रा. बाबर यांनी सांगितले. सुलोचना बाबर यांनी वैभवच्या बालपणीच्या शाळेतील अनेक आठवणी सांगितल्या. जिजाबा नरळे व त्यांच्या पत्नी फुलाबाई नरळे यांनी चिरंजीव वैभव यांनी अभ्यासाबाबत घेतलेले कष्ट तसेच त्याची चिकाटी याबाबत तपशीलवार माहिती दिली . वैभव चा प्राथमिक शिक्षणाचा स्तर भक्कम केल्याबद्दल नरळे दाम्पत्यांनी क्रांतिवीर शाळेचे ऋण व्यक्त केले. यावेळी बोलताना वैभव नरळे म्हणाले जीवनात अवघड काहीही नाही फक्त गरज असते प्रयत्नाची. आई वडील, गुरुजन व आपणाला घडवलेल्या क्रांतिवीर शाळेबद्दल वैभव नरळे यांनी भावनिक मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन तुकाराम घाडगे यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार अनिल काटकर यांनी व्यक्त केले.
