म्हसवड (प्रतिनिधी )–भौतिक सुविधांसोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत, असे आवाहन पंचायत समिती माणचे नूतन सभापती माननीय विक्रम शिंगाडे यांनी केले. ते जिल्हा परिषद शाळा बनगरवाडी येथे ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या उपक्रमाच्या प्रसंगी बोलत होते.यावेळी बोलताना सभापती शिंगाडे यांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत शिक्षकांनी वाडी-वस्तीवरील सर्व मुलांचे सर्वेक्षण करून एकही मुलगा शाळेबाहेर राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगितले. सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गावपातळीवर सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे यांनी शासनाच्या ‘पट वाढवा’ उपक्रमाची सविस्तर माहिती देत शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व शिक्षक यांच्या समन्वयातून विद्यार्थी पट वाढवून शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.राज्य शासनाने नुकतीच या उपक्रमाची सुरुवात केली असून सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विद्यार्थी पट वाढीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या अभिनव उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.या कार्यक्रमास केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे, पोलीस पाटील बनगर, पत्रकार विठ्ठल काटकर, केंद्र संचालक शिवाजी शिंगाडे (वरकुटे-मलवडी), तसेच बनगरवाडी येथील पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन विठ्ठल काटकर यांनी केले. Post navigation फटाके- गुलाल आणि ढोल ताशा तयार पण जि. प. नूतन अध्यक्षाचा पत्ता नाही बार्शीचा अभिमान, प्रा. डॉ.राहुल पालके यांचे गेट परीक्षेत यश