बार्शी (प्रतिनिधी):
श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे रसायनशास्त्र विभागाच्या वतीने बी.एस्सी. भाग ३ च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.यावेळी शिवाजी महाविद्यालय परंडा येथील प्राचार्य प्रो. टी. एन. लोखंडे आणि कला समन्वक डॉ. बी. डी. पारसे हे उपस्थित होते.
कार्यक्रमात प्राचार्य ए. बी. शेख यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांचा महत्त्वपूर्ण वाटा अधोरेखित करताना सांगितले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ महाविद्यालयीन शिक्षण पुरेसे नसून पालकांनी त्यांच्या अभ्यास आणि वर्तणुकीवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रोफेसर एस. एच. गायकवाड यांनी विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली. पालक मनोगते प्रातःनिधिक स्वरूपात लोहार सर आणि खैरे सर यांनी व्यक्त केली. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक शिस्त आणि उपक्रमांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब सोनवणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रदीप काटे व डॉ. राहुल पालके यांनी मानले. सदरील मेळावा यशस्वी होण्यासाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला बहुसंख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *