माण पंचायत समिती सभापती विक्रम शिंगाडे यांच्यासह आठ जणांवर म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल महिलेचा विनयभंग आणि घरात घुसून दमदाटी केल्याचा आरोप; वरकुटे मलवडी येथील घटना म्हसवड (प्रतिनिधी): माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, वैभव शिंगाडे आणि इतर सहा अनोळखी व्यक्तींविरोधात महिलेचा विनयभंग, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे १ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. काय आहे नेमके प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, वरकुटे मलवडी येथील रहिवासी व अंगणवाडी सेविका मुमताज खुदबुद्दीन इनामदार (वय ४३) यांनी याप्रकरणी म्हसवड पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५० ते २ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीच्या घरासमोर येऊन दरवाजा वाजवला. ‘एंटी व्हायरस’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर फिर्यादीचा मुलगा आरमान याने आक्षेपार्ह मेसेज टाकल्याचा आरोप करत आरोपींनी त्याला तत्काळ बोलावून घेण्याची मागणी केली. “आरमानला बोलावून घ्या, नाहीतर आम्ही येथून जाणार नाही; त्याला सोडणार नाही आणि त्याचे हात-पाय तोडू,” अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाशी दमदाटी केली. या दरम्यान, विक्रम शिंगाडे यांच्यासोबत आलेल्या एका अनोळखी इसमाने फिर्यादीच्या मुलीचा (सानिया) हात पकडून तिच्याशी लज्जास्पद कृत्य (विनयभंग) केले, असे तक्रारीत म्हटले आहे. ८ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल याप्रकरणी पोलिसांनी विक्रम शामराव शिंगाडे, वैभव शिंगाडे (दोघे रा. बनगरवाडी, ता. माण) आणि इतर सहा अनोळखी व्यक्तींविरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गु. र. नं. २७९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, १८९(२), १८९(३), १९०, ३३३ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून तपास सुरू घटनास्थळाला म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) पोमण यांनी भेट दिली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (पोऊनि) अमित शिंदे करत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींच्या शोधासाठी तजवीज ठेवण्यात आली आहे. पंचायत समिती सभापतींवर गुन्हा दाखल झाल्यामुळे संपूर्ण माण तालुक्यात राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. Post navigation फलटण मध्ये मंत्री गोरे यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश! नळदुर्ग येथे संत निरंकारी सेवादल प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; दशकपूर्ती सोहळा व बॅगांचे वाटप…