“सर्प हा मानवाचा शत्रू नसून मित्र आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्पांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन सर्पमित्र संतोष शिंदे यांनी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर केले.माण तालुक्यातील म्हसवड येथे नाभिक समाजच्या वतीने नागदेवतेची स्थापना करून सर्व लोक भक्तिभावाने दर्शन घेतात. शिंदे पुढे म्हणाले, “नागदेवतेची पूजा ही भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, श्रद्धेबरोबरच सर्पांचे संवर्धन होणेही आवश्यक आहे. पृथ्वीवरील अनेक वनस्पती व प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर असून, अनेक प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे निसर्गातील प्रत्येक जीवाचे महत्त्व ओळखून त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे.” माण तालुक्यातील विविध भागांत सध्या नाग, मण्यार, घोणस यांसारखे विषारी तसेच त्रिकट, धामण, दिवड, कवड्या, मांडूळ आदी बिनविषारी सर्प आढळून येत आहेत. सर्प दिसल्यानंतर घाबरून न जाता त्याला सुरक्षितपणे निसर्गाच्या अधिवासात सोडण्यासाठी सर्पमित्रांची मदत घ्यावी. सर्पांची विनाकारण हत्या करू नये, असे आवाहन शिंदे यांनी केले. “सर्प वाचवणे हीदेखील धर्माचीच शिकवण आहे. सर्प हा शेतीसाठी उपयुक्त असून उंदीर व अन्य कीटकांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्वाचे काम तो करतो. त्यामुळे सर्पांचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण होय,” असेही त्यांनी सांगितले. सर्पदंश झाल्यास घाबरू नका .सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता संबंधित व्यक्तीला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करावे. सर्पदंशावर वैद्यकीय उपचार उपलब्ध असून, वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पारंपरिक उपाय करण्याऐवजी तातडीने वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे असल्याचे सर्पमित्र संतोष शिंदे यांनी स्पष्ट केले. नागपंचमीच्या निमित्ताने नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता सर्पांविषयी जनजागृती करावी आणि निसर्गातील या महत्त्वपूर्ण घटकाचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले. Post navigation सायगाव परिसरात कालव्याची अवस्था झाली झाड झुडपातील पाऊलवाट सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने जलसंधारण जनजागृती मोहीम