पंढरपूर, दि.11: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना त्यांच्या दीर्घकालीन आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, वारकरी सेवा तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सेवाकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘विठ्ठल सेवा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा (रजि.), महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष ‘Felicitation Ceremony’ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर (Y. B. Chavan Center), नरिमन पॉईंट, मंत्रालयासमोर, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, कर्नाटकचे ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री तथा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष ईश्वर खांड्रे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

मंदिर सेवा व भाविकांच्या सुविधांसाठी योगदान

गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या माध्यमातून मंदिर संवर्धन, भाविकांना सुलभ दर्शन, यात्रा नियोजन, स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य सुविधा, निवास व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने योगदान दिले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला गती देणे, मंदिराच्या ऐतिहासिक व धार्मिक वास्तूचे जतन करणे, मोठ्या यात्रांमध्ये लाखो भाविकांसाठी नियोजनबद्ध सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करणे तसेच वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. आषाढी, कार्तिकी यांसह विविध यात्रांच्या काळात दर्शन व्यवस्था, भाविकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था, दर्शन रांग व्यवस्थापन आणि महिला भाविकांसाठी आवश्यक सुविधा याबाबत मंदिर समितीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या नियोजनात त्यांचे मार्गदर्शन राहिले आहे. तसेच वारकरी परंपरा, संत साहित्य, कीर्तन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या कार्यालाही त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.

यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरव

गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कार्याची यापूर्वीही विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. त्यांना ‘महाराष्ट्ररत्न पुरस्कार’, ‘शनिरत्न पुरस्कार’ तसेच ‘मानवसेवा जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार’ अशा विविध 30 ते 32 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कीर्तन/समाजप्रबोधन क्षेत्रातील पुरस्कारासाठीही त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. धार्मिक व आध्यात्मिक कार्यासोबतच वारकरी संप्रदायाची परंपरा, कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि मानवसेवा या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना विविध सन्मान प्राप्त झाले आहेत.

पंढरपूरच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव

‘विठ्ठल सेवा पुरस्कार’ हा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव असला, तरी त्यामागे पंढरपूरची समृद्ध वारकरी परंपरा, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सेवा आणि लाखो वारकरी भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान दडलेला आहे. त्यांच्या या सन्मानामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने केलेला हा गौरव पंढरपूरसह महाराष्ट्रातील वारकरी व भक्त परिवारासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *