सातबारा क्रमांक 1105 मध्ये विहीरच नसल्याचा दावा ;

अनधिकृत बांधकामाच्या उल्लेखामुळे संभ्रम,
धोकादायक विहिरीबाबत प्रशासनाची भूमिका चर्चेत
….

वडूज -प्रतिनिधी विनोद लोहार-

तडवळे गावच्या हद्दीत रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरीच्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. या विहिरीसंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयाकडून संबंधित मालकांना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र या आदेशातील काही बाबींवर ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्रशासनाने नोटीसमध्ये सातबारा क्रमांक 1105 चा उल्लेख केला आहे. मात्र संबंधित सातबाऱ्यामध्ये विहीरच नसल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या मालमत्तेच्या संदर्भात कारवाई सुरू आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
याशिवाय नोटीसमध्ये “जमिनीमध्ये विनापरवाना व अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत आहे” असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र संबंधित विहिरीमध्ये अनेक भागधारकांचा हिस्सा असून ही विहीर अनेक वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत विहीर अनधिकृत कशी ठरविण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, या धोकादायक विहिरीच्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा काही व्यक्तींनी केला असताना श्रेय मात्र इतरांकडून घेतले जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. त्यामुळे “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
रस्त्यालगत असलेल्या या विहिरीमुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने संरक्षक कठडा, जाळी किंवा संबधित मालकांची परवानगी असेल तर विहीर मुजवण्याची उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
आता या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार आणि धोकादायक विहिरीबाबत कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, याकडे तडवळेकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *