धुळदेव वृत्तसेवा .. (सचिन शिंगाडे)–

माण तालुक्यातील धुळदेव गावातील एका सामान्य गवंडी कामगार आणि ऊसतोड मजूर कुटुंबातील मुलीने परिस्थितीच्या भिंती ओलांडून पोलीस दलात प्रवेश मिळवला आहे. कु.सोनाली बापू पाटोळे असे या रणरागिणीचे नाव असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात तिचे कौतुक होत आहे.

सोनालीचा शैक्षणिक प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. तिचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. आई-वडील कामानिमित्त बाहेर गावी असल्यामुळे काही काळ तिने गाडगे महाराज आश्रम शाळा, गोंदवले येथे राहून शिक्षणाचे धडे गिरवले. त्यानंतर, म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल मध्ये तिचे पुढचे शिक्षण सुरू झाले. विशेष म्हणजे, आपले शिक्षण सुरू असतानाच तिने पोलीस भरतीचा सराव आणि जिद्दीने तयारी सुरू ठेवली होती.

बापू पाटोळे यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची. दोन मुले आणि दोन मुली अशा मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आई-वडिलांना दिवसभर कधी गवंडी काम कधी ऊसतोडणी करावी लागते. घरात एक मुलगा अपघाताने अपंग झालेला, तर दुसरा शिक्षण घेत आहे. ज्या समाजात आणि गावात मुलींचे शिक्षण अर्धवट सोडून त्यांचे लवकर लग्न लावून दिले जाते, तिथे सोनालीने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. निकालाच्या दिवशी तिचे आई-वडील कामावर घाम गाळत असतानाच सोनाली पोलीस झाल्याची बातमी आली आणि त्यांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले.

“आमच्या घरात पिढ्यानपिढ्या शिक्षणाने पाऊल ठेवले नव्हते, पण माझ्या मुलीने तो दुष्काळ कायमचा संपवला,” अशा भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केल्या. रामोशी समाजातील ही प्रगती आणि सोनालीने मिळवलेले यश गावातील इतर मुलींसाठी एक नवा आदर्श ठरले आहे.
तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल धुळदेव आणि म्हसवड परिसरातून सोनालीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *