क्रांती रंग स्नेह संमेलन व महापरिनिर्वाण दिनाचा योगायोग,
“रमाचं नांदणं” गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
म्हसवड.. प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रात माण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात मोठा नावलौकीक असलेल्या म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलनामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेला क्रांतीरंग स्नेहसंमेलनाचा रौप्य महोत्सवी वर्षातील कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
क्रांतीरंग स्नेहसंमेलन व महापरिनिर्वाण दिनाचा योगायोग हा दुग्ध शर्करेचा योग ठरला असून या निमित्ताने सादर केलेल्या नांदण, नांदण होतं रमाचं नांदण या गाण्या वरील नृत्यास रसिक प्रेक्षकाकडून खूप मोठा प्रतिसाद मिळाला.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलनामध्ये नेहमीच विद्यार्थ्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी
दरवर्षी संस्थेअंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. क्रांतीरंग वार्षिक
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मौजे खडकी गावचे सुपुत्र व पश्चिम बंगाल येथील ज्वेलरी विभागातील यशस्वी उद्योजक वसंतराव औताडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, संस्था उपाध्यक्ष ॲडवोकेट इंद्रजीत बाबर, संस्था सचिव सुलोचना बाबर, पालक प्रतिनिधी मान्यवर यांच्यासह संकुलातील विविध शाखांचे प्रमुख उपस्थित होते. म्हसवडच्या माळरानावर प्रा. विश्वंबर बाबर व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी सुमारे २५ वर्षापुर्वी लावलेल्या या शैक्षणिक रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे. या संकुलनाने आजवर अनेक आदर्श विद्यार्थी घडवले आहेत तर शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील अनेक राज्यस्तरीय सन्मान संकुलनाने मिळवलेले असुन पालकांच्या विश्वासाचे व विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीचे शैक्षणिक संकुल ठरले आहे. वैद्यकीय शाखेत या संकुलातील विद्यार्थी दरवर्षी चांगल्या संख्येने जात असल्याने क्रांतिवीर संकुलाने शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित सदर स्नेहसंमेलनात संकुलातील विविध शाखा मधील इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी घेऊन वैशिष्ट्यपूर्ण कलागुणांचा अविष्कार दाखविला . यावेळी कोळीगीत, शेतकरी गीत, लावणी, तसेच हिंदी मराठी चित्रपटातील बहारदार गाण्यावरील तसेच वैशिष्ट्यपूर्ण, शिवदर्शन प्रबोधनात्मक डान्स विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमास रसिक प्रेक्षक व पालकांनी खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील सर्व शिक्षक व सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
.

