तंजावर येथे २३ सप्टेंबरला ‘सरफोजीराजे भोसले द्वितीय’ मराठी साहित्य संमेलन;

स्वागताध्यक्षपदी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची निवड
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ऐतिहासिक निर्णय
तंजावर:

मंगळवेढा,सोलापूर वृत्तसेवा…
तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर नगरीत येत्या २३ सप्टेंबर २०२६ रोजी तंजावरचे महान राजे सरफोजीराजे भोसले द्वितीय यांच्या जयंतीनिमित्त भव्य ‘मराठी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्राचे माजी उच्च शिक्षण मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तंजावर (तामिळनाडू) येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तंजावर या बैठकीत संमेलनाच्या आयोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या प्रसंगी तंजावर संस्थानाचे श्रीमंत बाबाजीराजे भोसले, तंजावर संस्थानचे युवराज तथा साहित्य परिषदेचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे भोसले, तसेच लक्ष्मण हेंमाडे, किशोर टिळेकर, अजय साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजे सरफोजी द्वितीय: १० हून अधिक भाषांवर प्रभुत्व असलेले अद्वितीय ‘बहुभाषिक’ पंडित
तंजावरचे भोसले घराणे हे केवळ शौर्यासाठीच नव्हे, तर ज्ञान, विज्ञान आणि साहित्याच्या संवर्धनासाठी जगभर प्रसिद्ध आहे. राजे सरफोजी द्वितीय (१७९८-१८३२) हे खऱ्या अर्थाने ‘बहुभाषिक’ (Polyglot) होते. त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी ख्रिश्चन फ्रेडरिक श्वाार्ट्झ यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यामुळे त्यांना भारतीय भाषांसोबतच अनेक पाश्चात्त्य भाषांवरही विलक्षण प्रभुत्व मिळवता आले. त्यांना १० पेक्षा जास्त भाषा उत्तम प्रकारे अवगत होत्या:
भारतीय भाषा: मराठी (मातृभाषा), संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू (हिंदुस्तानी).
पाश्चात्त्य व परदेशी भाषा: इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लॅटिन, ग्रीक, डच आणि डॅनिश.
या अथांग भाषाज्ञानाच्या बळावरच त्यांनी जगभरातून विविध विषयांवरील ३९,००० पेक्षा जास्त दुर्मिळ हस्तलिखिते आणि पुस्तके गोळा केली. जगातील सर्वात जुन्या आणि दुर्मिळ ग्रंथालयांपैकी एक असलेल्या ‘तंजावर महाराज सरफोजी सरस्वती महाल ग्रंथालया’चे (Sarasvati Mahal Library) खरे शिल्पकार राजे सरफोजी द्वितीय हेच आहेत.
राजे सरफोजींची अजरामर ग्रंथसंपदा आणि साहित्यिक योगदान
राजे सरफोजींनी स्वतः अनेक भाषांमध्ये विपुल लेखन केले. वैद्यकशास्त्र, कला, नाटक, विज्ञान आणि इतिहास या विषयांवर त्यांनी लिहिलेले प्रमुख ग्रंथ खालीलप्रमाणे आहेत:
सरवेन्द्र रत्‍नावली (Sarvendra Ratnavali): हा ७२ खंडांचा (Volumes) एक महाग्रंथ असून यात सर्व प्रकारची शास्त्रे, कला आणि नाट्यशास्त्र याविषयीच्या ज्ञानाचे संकलन आहे. या ग्रंथामुळेच त्यांना ‘सरवेन्द्र रत्‍नाधिपती’ असेही म्हटले जाते.
शरभेंद्र वैद्य मुरगळ (Sarabhendra Vaidhya System): वैद्यकशास्त्रावरील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ. यात आयुर्वेद, युनानी व सिद्ध पद्धतींमधील औषधोपचारांची सविस्तर माहिती दिली आहे.
देवेंद्र कुरवंजी (Devendra Kuravanji): हे त्यांनी मराठी भाषेत लिहिलेले एक प्रसिद्ध नृत्यनाट्य (Dance Drama) आहे, ज्यामध्ये गाण्यांच्या व नृत्याच्या माध्यमातून जगाचा भूगोल मांडला आहे.
गज शास्त्र (Gaja Sastra): हत्तींचे व्यवस्थापन, त्यांचे आजार, उपचार आणि संगोपन या विषयावरील मोलाचा ग्रंथ.
महाकाव्ये आणि नाटके: संस्कृत साहित्यातील उत्कृष्ट गद्य-पद्य मिश्रित ‘कुमारसंभव चम्पू’, विशाखदत्त यांच्या नाटकावरील टीकाग्रंथ ‘मुद्राराक्षसच्छाया’, संगीत व नाट्यकलेला वाहिलेले ‘राधाकृष्ण विलासनाटक’ आणि पौराणिक कथेवर आधारित ‘मोहिनीमहेश परिणय’ व ‘गणेशविश्वेश्वर परिणय’ या नाटकांची त्यांनी रचना केली.
इतर ग्रंथ: ‘कुमारसंभव टीका’ (भाष्य), ‘स्मृति ईशविग्रह’ (धार्मिक व आध्यात्मिक विषय) आणि ‘पालकापुजा’ (धार्मिक विधी).
याशिवाय, त्यांनी भरतनाट्यम् साहित्यासाठी अनेक ‘अलारिपु’, ‘जतीस्वरम’, ‘शब्दम’, ‘पदम’ आणि ‘शब्दावर्णम’ यांची रचना केली असून शेकडो गाणी स्वतः संगीतबद्ध केली आहेत.
सामाजिक, आरोग्य आणि कला क्षेत्रातील क्रांती
आरोग्य क्षेत्रातील योगदान (धन्वंतरी महाल): राजे सरफोजींनी ‘धन्वंतरी महाल’ या संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यांनी स्वतः डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचे (Cataract Surgery) तंत्र विकसित केले होते आणि रुग्णांच्या नोंदी चित्रांसह ठेवून घेतल्या होत्या.
कला आणि संगीत: पाश्चात्त्य संगीतातील ‘बँड’ संस्कृती भारतात आणून त्यांनी ‘तंजावर बँड’ची स्थापना केली. भरतनाट्यम् नृत्यप्रकाराला आधुनिक रूप देण्याचे श्रेयही त्यांना जाते.
शैक्षणिक सुधारणा आणि छापखाना: त्यांनी तंजावरमध्ये इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या. तसेच दक्षिण भारतात पहिले मोडी आणि देवनागरी लिपीचे छापखाने (Printing Press) सुरू केले.

मराठी आणि तमिळ संस्कृतीचा ऐतिहासिक दुवा: डॉ. शरद गोरे
बैठकीनंतर पत्रकारोंशी बोलताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे म्हणाले, “तंजावर ही मराठी संस्कृतीची दक्षिणेतील पंढरी आहे. राजे सरफोजी द्वितीय यांचे साहित्य, विज्ञान, भाषाप्रभुत्व आणि कलेतील योगदान आजही संपूर्ण जगाला दिशा देणारे आहे. अशा क्रांतीकारी राजाच्या जयंतीदिनी, तंजावरच्या भूमीत हे संमेलन होणे हा मराठी भाषेचा आणि इतिहासाचा परमगौरव आहे. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या स्वागताध्यक्षतेखाली हे संमेलन ऐतिहासिक ठरेल.”
या संमेलनामुळे महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमधील सांस्कृतिक संबंध अधिक घट्ट होणार असून, देशभरातून अनेक साहित्यिक, संशोधक आणि इतिहासप्रेमी या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत ,दक्षिण भारतीय होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *